थायलंड वारी गुरुजींना पडली महागात ! सोनावळे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबित.
जुन्नर (पुणे): जुन्नर तालुक्यातील सोनावळे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बी.आर. लोखंडे हे कुणालाही न सांगता थायलंडच्या पट्टाया येथे फिरून आले होते. याची माहिती मिळताच ठाणे येथील आदिवासी अप्पर आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करत सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे.
शासकीय कर्मचारी परदेशवारी करणार असल्यास शासनाची रीतसर पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट काढतानाही शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.
- परदेश प्रवास करताना कारण, कालावधी व खर्चाचा खुलासा करणे आवश्यक आहे.
- कोणतीही माहिती न देता परदेशवारी केल्यास ती गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाते.
मुख्याध्यापक लोखंडे यांनी या नियमांचे उल्लंघन करून थायलंडचा दौरा केला. शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी ही परदेशवारी केली. याबाबत मागवण्यात आलेला खुलासा त्यांनी दिला नव्हता.
तक्रारीवरून कारवाई
सोनावळे ग्रामपंचायतीने मुख्याध्यापक लोखंडे यांच्या गैरप्रकाराबाबत तक्रार केली होती. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सविस्तर तपास करून अहवाल अप्पर आयुक्त कार्यालयात सादर केला. त्यानंतर ठाणे आदिवासी आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई करत लोखंडे यांना निलंबित करण्याचे आदेश बजावले.
थायलंड का गाजते?
थायलंड हे भारतीय पर्यटकांचे आकर्षण केंद्र मानले जाते. समुद्रकिनारे, थाई मसाज, पब-डिस्को आणि मौजमजा यामुळे अनेक भारतीय तिकडे जातात. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांसाठी ही मौजमजा परवानगीशिवाय महागात पडू शकते, हे लोखंडे यांच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.


0 टिप्पण्या