जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने शाळेतच घेतला गळफास;धारासूर येथील धक्कादायक घटना.
परभणी,दिनांक २६/१२/२०२२-
ज्या शाळेत गुरुजी दररोज शिकवायला यायचे त्याच शाळेत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारासुर तांडा येथे घडली. शाळेच्या कार्यालयातच शिक्षकांनी गळफास घेतल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत एकच खळबळ उडाली आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विठ्ठल रत्नपाखरे (वय ४५) नेहमीसारखे शाळेत आले खरे पण शेवटचेच. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना रत्नपाखरे यांनी शाळेत कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्यासाठी मुलांना बिस्कीट आणण्यासाठी शंभर रुपये देऊन गावातील किराणा दुकानावर पाठवले.मुले आनंदाने बिस्किटे आणण्यासाठी गेले. त्यानंतर लगेच रत्नपाखरे यांनी शाळेच्या कार्यालयातील छताला असलेल्या लोखंडी हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
काही वेळानंतर शाळेतील अन्य शिक्षक,विद्यार्थी तेथे दाखल झाले. रत्नपाखरे सर गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.शिक्षकांनी याची माहिती लगेच गावातील ग्रामस्थांना दिली. गावातील सरपंच राजाभाऊ गवळे व गंगाधर कदम यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली. घटनेची माहिती समजतात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केंद्रप्रमुख विठ्ठल प्रसाद पवार शिक्षक साहेबराव राठोड, गोविंद रूढी सुशील तडवी यांच्या समक्ष पंचनामा करत रत्न पाखरे यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सदा हसतमुख असणारे गुरुजी अचानक आत्महत्या सारखे टोकाचे पाउल उचलले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


0 टिप्पण्या